घाटमाथ्यावर मान्सूनपूर्व पाऊस नाहीच;पेरणीपूर्व मशागती रखडल्या

Admin

 

घाटनांद्रे  : डिजिटल हॅलो प्रभात (जालिंदर शिंदे)
        जून महिना उजाडला तरी अद्याप कवठेमहांकाळ तालुक्यात मान्सूनचा कसलाच पत्ता नाही.अवकाळी,मान्सून पूर्व किंवा मान्सूनचा पाऊसच झाला नसल्याने कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील पेरणीपूर्व मशागती रखडल्याअसुन,खरीप हंगामाच्या पेरण्या वेळेत होणार का ? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे आ वासून उभा आहे.  तालुक्यातील ओढे,नाले,बंधारे कोरडे ठणठणीत पडले आहेत तर विहिरीनीही
    चांगलाच तळ गाठला आहे.वाढत्या उष्णतेने तलावातील पाणीसाठाही झपाट्याने कमी होऊ लागला आहे.
घाटनांद्रे,कुंडलापूर,तिसंगी,वाघोली,गर्जेवाडी,जाखापूर व कूचीसह तालुक्यात यावर्षी अद्याप अवकाळी,मान्सून पूर्व किंवा मान्सूनचा कसलाच एकही दमदार पाऊस झाला नाही.त्यामुळे म्हणाव्या तश्या मशागती करता आल्या नाहीत.काही शेतकरी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पूर्व मशागत करुन पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
            त्यातच गतवर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे काही तलावात जून पर्यंत पाणीसाठा टिकून आहे.त्यातून व शेततळ्यांतील उपलब्ध पाण्याच्या मदतीने रब्बी व द्राक्ष हंगामही कसाबसा पार पडला आहे. सद्या तालुक्यातील दहा लघु व एक मध्यम प्रकल्प तलावांपैकी लांडगेवाडी व हरोली ह्या दोन तलावात मृत संचय पाणीसाठा आहे.त्याचबरोबर
        म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु असल्याने लांडगेवाडी,नांगोळे व बंडगरवाडी तलावात या योजनेचे पाणी सोडले आहे.उर्वरित तलावात मध्यम स्वरूपाचा पाणीसाठा शिल्लक आहे.घाटमाथ्यावरील गावांची शेती प्रामुख्याने पावसावरच अवलंबून आहे.टेंभू योजनेचे पाणी घाटमाथ्यावरील काही गावात आले आहे पण तेही पुर्ण क्षमतेने नसल्याने त्याचा कोणताही फायदा बळीराजाला होताना दिसत नाही.
            सध्या घाटमाथ्यावर टेंभू योजनेचे पाणी दाखल झाले असले तरी शेतकरी मात्र मान्सूनच्या प्रतीक्षेत टक लावून आहे.त्यामुळे खरीप हंगाम लांबणार का ? असे चित्र सध्या कवठेमहांकाळच्या घाटमाथ्यावर दिसत आहे.



To Top