जखमी खेळाडू अक्षर पटेलची दुखापत अजूनही बरी न झाल्याने आता त्याच्याऐवजी रविचंद्रन अश्विनचा टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. आयसीसीने याबाबतची माहिती दिली आहे.
विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या 15 जणांच्या स्कॉडमध्ये अक्षर पटेलचा समावेश होता, परंतु आता अक्षर पटेल सध्या दुखापतीचा सामना करत आहे. अक्षर पटेलच्या अनुपस्थिती अश्विनला संधी मिळालेली आहे.
ऑस्ट्रेलियाविरोधात अश्विनने दमदार कामगिरी केली. त्यामुळे अक्षर पटेल याच्या जागी अश्विनला संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. आशिया चषकात अश्विनचा टीम इंडियामध्ये समावेश नव्हता. अश्विनचा मायदेशात होणाऱ्या तीन सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला होता.
एक नजर अश्विनच्या एकदिवसीय सामन्यातील कारकीर्दवर
अश्विनने भारतासाठी 115 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या 115 सामन्यांमध्ये रवी अश्विनने 4.95 च्या इकॉनॉमी आणि 33.2 च्या सरासरीने 155 विकेट घेतल्या आहेत. 25 धावांत चार विकेट, ही अश्विनची वनडेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. त्याशिवाय गरज पडल्यास अश्विन फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. अश्विनने वनडेमध्ये 86.96 च्या स्ट्राइक रेटने आणि 16.44 च्या सरासरीने 707 धावा केल्या आहेत.
क्रिकेट विश्वचषक 2023 साठी टीम इंडिया :
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उप-कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, ईशान किशन, केएल राहुल,सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन