आईला शिवीगाळ करणाऱ्या भावाचा खून

Admin
सांगली : डिजिटल हॅलो प्रभात
    नांद्रे (ता.मिरज) येथे दारु पिवून आईला वारंवार शिवीगाळ करत असल्याच्या राग मनात धरून लहान भावाचा काठीने मारहाण केली आणि नंतर धारदार शस्त्राने वार करुन मोठ्या भावाने खून केला. दत्तात्रय प्रकाश कुंभार (वय ३०) असे मृताचे नाव असून, राहुल उर्फ बसवेश्वर प्रकाश कुंभार (वय ३२, रा. कुंभार गल्ली, नांद्रे ) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी मृत आणि संशयिताचे वडील प्रकाश यल्लाप्पा कुंभार यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
    पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी रात्री हा प्रकार घडला. मृत दत्तात्रय याला दारूचे व्यसन होते. यातून तो कुटूंबियांना त्रास देत होता. तो दारू पिवून आला की आईलाही शिवीगाळ करत असे. याचा राहूलला राग येत होता. याच त्रासाला कंटाळून आई-वडील दुसऱ्या ठिकाणी राहण्यास गेले होते. तिथेही जावून मृत दत्तात्रय त्यांना शिवीगाळ करत होता. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे राहूल दत्तात्रयवर चिडून होता. बुधवारी रात्रीही त्याने दारू पिवून येत आईला शिवीगाळ केली. यानंतर चिडलेल्या राहूलने लाकडी दांडक्याने मारहाण करत आणि धारदार शस्त्राने वार करून दत्तात्रयचा खून केला. घटनेची माहिती मिळताच सांगली ग्रामीण पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनीही भेट देत तपासाच्या सूचना दिल्या. संशयित राहूल यास पोलिसांनी अटक केली आहे.
Tags
To Top