प्रांतभेदामुळे साहित्यीकांची जबाबदारी वाढली : डॉ.कोमरपंत

Admin

इचलकरंजी : महेश आंबेकर
        आजच्या सामाजिक जाणिवा साहित्यात उमटलेल्या आहेत पण २१ व्या शतकातही सामाजिक प्रश्‍न सुटलेले नाहीत. भाषाभेद, प्रांतभेद याने समाजमन ग्रासले आहे. त्यामुळे साहित्यिकांची जबाबदारी वाढल्याचे मत गोवा विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख प्रो.डॉ.सोमनाथ कोमरपंत यांनी व्यक्त केले. ते येथील आक्काताई पाटील कन्या महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्र बोलत होते.
        येथील आक्काताई पाटील कन्या महाविद्यालयात २१ व्या शतकातील मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्यातील सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ या मुख्य विषयाच्या अनुषंगाने एक दिवसीय बहुभाषिक राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी प्राचार्य डॉ. त्रिशला कदम यांनी जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरणाच्या प्रवाहात अर्थकारणात जसे बदल झाले तसे साहित्यामध्येही ते झाले. त्यामुळे २१ व्या शतकातील मराठी साहित्यात उमटलेले सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ यांचा अभ्यास करण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन केल्याचे सांगितले. चर्चासत्राचे उद्घाटन विवेकानंद महाविद्यालय,कोल्हापूरचा प्राचार्य आर.आर. कुंभार यांच्या हस्ते झाले. यावेळी कुंभार यांनी सध्या समाजात दलित आणि सवर्ण यांच्यात एक दरी निर्माण झाली आहे. परंतु भाषा, साहित्याचा अभ्यास करताना समाजाचा विचार होणे गरजेचे असल्याचे सांगितले. 
        चर्चासत्राच्या पहिल्या सत्रात डॉ. श्रुती जोशी यांनी २००१ नंतरच्या महत्वाच्या इंग्रजी साहित्याचा आढावा घेऊन आपल्या सामाजिक आणि सांस्कृतिकतेचे प्रतिबिंब साहित्यात उमटल्याचे उदाहरणांसह सांगितले. दुसर्‍या सत्रात डॉ. गिरीश काशीद यांनी हिंदी साहित्यातील प्रदेशानुसार बदलेले सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ स्पष्ट केले. चर्चासत्रात कर्नाटक, आंध्रप्रदेश, पश्‍चिम बंगाल, गोवा त्याचबरोबर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून १५० शोधनिबंध आले होते. या चर्चासत्रातअनेक संशोधकांनी आपल्या शोधनिबंधाचे वाचन केले तर काही संशोधक प्राध्यापकांनीही मनोगते व्यक्त केली. यावेळी राष्ट्रीय चर्चासत्राचे समन्वयक प्रो. डॉ सुभाष जाधव, डॉ.पूर्णानंद च्यारी, रामेश्‍वरी कुदळे, संदिप पाटील आणि डॉ. अंजली उबाळे, सुधाकर इंडी उपस्थित होते. चर्चासत्र यशस्वीतेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या मराठी, हिंदी, इंग्रजी विभागाचे शिक्षक संघ, रोटरी क्लब अतिग्रे, इनरव्हिल क्लब इचलकरंजी, बँक ऑफ महाराष्ट इचलकरंजी शाखा, मैत्री फाउंडेशन तसेच डॉ. विठ्ठल नाईक, दिपक सरनोबत यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.
To Top