रक्त घ्या पण पाणी द्या...
दुष्काळग्रस्त लोकांची महामार्गावर रक्तदान करत मागणी
जत पूर्व भागातील ६५ गावांना पाणी द्या यासह अन्य मागण्यांसाठी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यातील बालगाव येथे एक दिवसीय लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बालगावात रक्त घ्या...पण पाणी द्या म्हणत ५१ तरुणांनी थेट राष्ट्रीय महामार्ग रोखत रक्तदान करत अनोखे आंदोलन केले.
पाण्यासाठी उमदी- विजयपूर राष्ट्रीय महामार्ग आंदोलनकर्त्यांनी रोखल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची रांगा लागल्या होत्या.जत पूर्व भागातील वंचित ६५ गावांना म्हैसाळ योजनेतून तातडीने पाणी द्या, मायथळ कॅनॉल पासून गुडडापूर, अंकलगी, संख तलावात सायपन पद्धतीने म्हैसाळचे पाणी येवू शकते पण ती देण्यास टाळाटाळ होत आहे. पाणी उशाला कोरड घशाला पडली आहे तेव्हा यासंदर्भात ठोस निर्णय घ्या, रक्त घ्या पण जत तालुक्यातील वंचित गावांना पाणी द्या, जत पूर्व भागासह ज्या तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे तेथील तलावाची दुरुस्ती करा, बंधाऱ्यांची दुरुस्ती करा, संख मध्यम प्रकल्पातील कॅनेलची दुरुस्ती करा, वाढीव लोकसंख्येप्रमाणे जत तालुक्यातील जनतेला टँकरने पाणी पुरवठा करावा, जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करा, दुष्काळ निवारण उपाययोजना तातडीने करा या प्रमुख मागण्यांसाठी अंकलगी नंतर बालगाव येथे तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
गुरुवारी सकाळी अकरा वाजता बालगाव ग्रामपंचायतीसमोर लक्षवेधी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका मांडत शासन व प्रशासनाला पाणी देण्याची विनंती केली. यावेळी हभप तुकाराम बाबा महाराज यांच्यासह भाजपचे जत तालुका विधानसभा निवडणूक प्रचार प्रमुख तम्मणगौडा रविपाटील, बालगावचे सरपंच रमेश पाटील, उपसरपंच अमित हिरेमठ, बोर्गीचे सरपंच शिवराज बिराजदार, हळळीचे सरपंच रवि मेडिदार, अक्कळवाडीचे उपसरपंच कांतू शेजाळे, उमदी पाणी संघर्ष समितीचे निवृत्ती शिंदे, सुनिल पोतदार, सुभाष कोकळे, शिवानंद माळकोटगी, परशुराम माळी, माजी जि.प.सदस्य शावरसिद्ध दुधगी, अनिल कोटी, राजू हविनाळ, विठ्ठल चलवादी,शिवानंद पाटील, रमेश माळी, आप्पालाल मुल्ला, कुमार लोणी यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठया संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.रस्त्यावरच रक्तदान बालगाव ग्रामपंचायतीसमोर लक्षवेधी आंदोलन केल्यानंतर आंदोलकानी थेट उमदी- विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या मांडला. शासन, प्रशासनाला पाणी देण्याची मागणी करत थेट ५१ जणांनी रस्त्यावर रक्तदान करत पाणी द्या ची मागणी केली. हभप तुकाराम बाबांच्या या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मागील महिन्यात हभप तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात अंकलगी येथे ७० हुन अधिक जणांनी रक्तदान केले होते.
याठिकाणी मैशाळ योजनेचे अधिकारी भेट देऊन उर्वरित भागाचे सर्व्हे करुन काम करू त्यासाठी सहा महिन्याचे मुदत मागितले आहे. यावेळी तुकाराम बाबा व गावकरी यांनी तात्पुरते आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला, माञ जो पर्यंत पाणी मिळत नाही तोपर्यंत दर महिन्यात प्रत्येक गावात हे आंदोलन जत पूर्व भागात सुरू राहील असे सांगितले.