सोन्या घायाळ सह त्याच्या पाच साथीदारांवर
मकोका अंतर्गत कारवाई
लोणी काळभोर : हॅलो प्रभात
लोणी काळभोर परिसरात खून, खुनाचा प्रयत्न,जबर मारहाण करणे, यांसह विविध गुन्हेगारी कृत्य करून नागरिकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या सोन्या ऊर्फ निखील घायाळ याच्यासह त्याच्या इतर पाच सहकाऱ्यांवर पुणे शहर पोलिस आयुक्तालयाने महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई केली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्या ऊर्फ निखील घायाळ (रा.लोणी स्टेशन,कदम वाकवस्ती) याने व त्याच्या साथीदारांनी २३ डिसेंबर रोजी येथील एका शेतकऱ्याला त्याच्या शेतातील पोल्ट्री फॉर्ममध्ये जावून शिवीगाळ करुन कोयत्याने वार करत लोखंडी रॉड व दगडाने मारहाण केली होती. यावेळी सोन्या घायाळ याने त्याच्या हातातील कोयता हवेत फिरवून 'सोन्या घायाळचा हिसका बघितला का? बघतोच एक एकाला' असे म्हणत पोल्ट्री फॉर्मवर काम करणाऱ्या कामगारांमध्ये दहशत निर्माण केली होती.या प्रकारानंतर सोन्या व त्याच्या साथीदारांवर लोणी काळभोर पोलिसांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून सोन्या घायाळ (वय-३२), श्रीकांत मेमाणे (वय-२६), गणेश गोडसे (वय-२५), अविनाश कामठे (वय-२५) यांना अटक केली होती.तर इतर फरार दोघांवर गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, सोन्या (टोळी प्रमुख) हा लोणी काळभोर पोलीस स्टेशन अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून सध्या तडीपार आहे.त्याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली.या टोळीने १० वर्षात खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, अॅट्रॉसिटी, बेकायदेशीररीत्या हत्यारे बाळगून दहशत निर्माण करणे, विनयभंग, पोक्सो, गावठी हातभट्टी तयार करणे इत्यादी प्रकारचे गुन्हे केले आहेत.त्यामुळे या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट, राजेंद्र पन्हाळे यांनी परिमंडळ पाचचे पोलीस उप-आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्यामार्फत पूर्व प्रदेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांना दिला होता. या प्रकरणाची छाननी करुन या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यास मान्यता दिली.