महायुती सरकारच्या बेशिस्त कारभारामुळे मुंबई पाण्यात : नाना पटोले

Admin
महायुती सरकारच्या बेशिस्त कारभारामुळे
मुंबई पाण्यात : नाना पटोले

मुंबई : हॅलो प्रभात
राज्यातील फडणवीस सरकार आज अक्षरशः पाण्यात गेले आहे. मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीपर्यंत पाणी पोहोचणं हे फक्त पावसाचं नव्हे, तर सरकारच्या उदासीनतेचं दर्शन आहे. निसर्ग स्वतःच सरकारला सावध करत आहे. महायुती सरकार हे भ्रष्टाचारी असून फक्त एका पाण्यातच मुंबई बुडते. कोट्यवधी रुपये खर्च करून देखील सरकार मुंबई स्वच्छ करू शकत नाही, चांगले रस्ते करू शकत नाही, ड्रेनेज सिस्टिम सुधारू शकत नाही. नद्यांमधील कचरा काढण्याच्या बहाण्याने कोट्यवधी रुपये लुटले जातात हे विदारक दृश्य आहे. हा सरकारचा बेशिस्त कारभार आहे असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.


युती सरकारच्या कारभारावर तोफ डागत पटोले पुढे म्हणाले की, अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका, धान आणि फळबागांचे भयानक नुकसान झालं आहे. मात्र सरकारकडून फक्त आकडेवारी वाचली जाते, मदतीचा एक थेंबही शेतकऱ्याच्या डोळ्यांतले अश्रू थोपवू शकलेला नाही. मागच्या वर्षीच्या नुकसानीची भरपाई अजूनही हवेत लोंबकळतेय, आणि शेतकरी मात्र आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. शेतकऱ्याला निवडणुकांच्या वेळी "राजा" म्हणणारेच आज त्याच्या दुःखाकडे पाठ फिरवत आहेत आणि म्हणूनच, मंत्रालय पाण्याखाली जाणं ही नुसती नैसर्गिक आपत्ती नाही तर ती एक चेतावनी आहे. गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकारने घेतल्या नाहीत. माननीय सुप्रीम कोर्टाला सरकारला चार महिन्यात निवडणुका घ्यायला सांगावे लागते तरीही या सरकारची निवडणूक घेण्याची इच्छा नाही. प्रशासक आणि सरकारच्या माध्यमातून जनतेची लूट सुरू आहे.

पुण्यातल्या पुरामागचं बिल्डर लॉबीचं कारस्थान...
उपमुख्यमंत्री अजित पवार अनेक वर्षं पुण्याचे पालकमंत्री आहेत तरीही शहरात असा पूर येतो की नद्या रस्त्यांवरून वाहतात, हे निष्काळजी नियोजन नाही, तर बिल्डर लॉबीसोबतच्या संगनमताचं फलित आहे. यांना जनतेशी काही देणंघेणं नाही, यामुळेच आज राज्यात सर्वत्र घाणीचे आणि पुराचे साम्राज्य पहायला मिळत आहे. आज एकीकडे पुराने राज्याला वेढले आहे, एकीकडे शेतकऱ्यांची पिके उद्धवस्त झाली आहे आणि दुसरीकडे अमित शहांच्या दौऱ्याची जय्यत तयारी नांदेड मध्ये सुरू आहे. याचाच अर्थ यांना जनतेच्या मतावर ऐशोआराम करायचा आहे असा आरोप पटोले यांनी केला आहे.

राहुल गांधी ओबीसींसाठी आवाज उठवणारे खरे नेते 
जातीनिहाय जनगणनेबाबत राहुल गांधी यांनी घेतलेली भूमिका ऐतिहासिक आहे. तेलंगणाप्रमाणे संपूर्ण देशात ही जनगणना झालीच पाहिजे हीच आमची भूमिका आहे. आपल्या शूर सैनिकांनी केलेल्या त्यागाला सलाम करण्याऐवजी मीच युद्ध जिंकले आहे असे भासवण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी करत आहेत. आपली पाठ आपल्या हाताने थोपटण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. ज्या भगिनींचे कुंकू पुसण्याचे पाप दहशतवाद्यांनी केलं ते दहशतवादी कुठे आहेत? त्याबद्दल काय भूमिका आहे? ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथे सुरक्षा का पुरवण्यात आली नाही? असे अनेक प्रश्न आहेत, म्हणून मिलिटरीचे कपडे घालून स्वतःच स्वतःची पाठ थोपटायची भूमिका पंतप्रधान मोदींनी घेतली आहे तिचा आम्ही निषेध करतो असे पटोले म्हणाले.

Tags
To Top